कोल्हापूर : यंदा साखर उत्पादन कमी झाल्याने केंद्र सरकारने गेल्यावर्षीच्या तुलनेत सातत्याने साखर विक्री कोट्यात घट केल्याने दरात फारशी घसरण झालेली नाही. कमी झालेले साखर उत्पादन, घटविलेला कोटा या कारणांसह आगामी काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर साखर दरात तेजी अपेक्षित आहे. सध्या साखरेच्या मागणीत हळूहळू वाढ होत असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
देशात सध्या साखरेचे दर स्थिर आहेत. प्रत्येक वर्षी सणांच्या काळात साखरेच्या मागणीत १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते. त्यानुसार, आता श्रावणाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरवाढीची शक्यता आहे. नजीकच्या काळात साखरेचे दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या भारतात साखरेचा साठा पुरेसा आहे. ३० सप्टेंबरअखेर शिल्लक साठा अंदाजे ५२ लाख मेट्रिक टन असेल. मात्र हा साठा गेल्यावर्षीच्या, ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या ८० लाख टन साठ्याच्या तुलनेत कमी असेल. हा साठा सुमारे दोन महिन्यांच्या वापराच्या बरोबरीचा आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये गेल्या ऑगस्टच्या तुलनेत कमी कोटा दिल्यास साखरेच्या किमती काहीशा तेजीत राहातील, असा अंदाज आहे. केंद्र सरकारने जुलैचा कोटा घटविल्यानंतर क्विंटलला ५० रुपयांपर्यंतची वाढ झाली होती.
सध्या सुरू झालेला श्रावण महिना आणि त्यानंतर येणारे गणेश चतुर्थी, नवरात्र, दिवाळी या सणांच्या काळात साखरेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित असते. ही वाढ मिठाई व्यावसायिकांसह घरगुती वापरासाठीही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे साखरेच्या दरातील तेजी कायम राहील अशी अपेक्षा आहे. देशात साखरेची सरासरी मासिक मागणी सुमारे २३.५० लाख टन इतकी असते. तथापि, सणांच्या काळात, विशेषतः श्रावण, गणेश चतुर्थी, नवरात्री आणि दिवाळीमध्ये, ही मागणी वाढते.