पुणे : शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची सुपीकता, लागण पद्धत, रासायनिक व सेंद्रिय खतांच्या मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन व पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर केला पाहिजे, असे कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी सांगितले. ‘साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी’च्या वतीने ‘एकरी १०० टन ऊस व एकरी ७५ टन खोडवा उद्दिष्टे’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘उसाची उत्पादकता वाढ’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. माने यांनी १९९७ पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रिया, अथक प्रयोग, प्रयत्न व मिळालेल्या यशाचा उल्लेख करून मार्गदर्शन केले.
फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी सांगितले, की साखर उद्योगापुढील आव्हाने, शेतकऱ्यांचे हित व आर्थिक उन्नतीसाठी, ऊस तोड कामगार, कर्मचारी या सर्व स्टेक होल्डर्सचा सर्वांगीण विचार करण्यासाठी हा टास्क फोर्स कार्यरत असतो. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी प्रास्ताविक केले. ‘ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे-पाटील यांनी खतांचा संतुलित वापर या विषयावर मार्गदर्शन केले. एकरी शंभर टना पेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी खंडू भुजबळ व नितीन वरखडे यांनी यशोगाथा सांगितली. डॉ. दीपक गायकवाड, अजित चौगुले, कार्यकारी संचालक, विस्मा यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमात शुगर टुडेचे संपादक नंदकुमार सुतार, महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील यांची भाषणे झाली. नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व माजी कार्यकारी संचालक यशवंत साखर कारखाना, थेऊर साहेबराव खामकर यांनी आभार मानले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.













