अहिल्यानगर : साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने जवळपास सर्वच साखर कारखाने प्रचंड तोट्यात गेल्याने मोठे आर्थिक संकट कारखान्यांसमोर उभे आहे. अशा कठीण प्रसंगात कारखाना व्यवस्थापन आर्थिक संकटांचा मुकाबला करून सभासद, ऊस उत्पादक, कामगारांच्या हितरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. कामगार दिनानिमित्त अशोक कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक भवनात कामगार मेळावा व सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. केंद्र व राज्य शासनाचे साखर उद्योगाला पाठबळ नसल्याने साखरेचा उत्पादन खर्च व शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफआरपी याची सांगड घालताना साखर उद्योग अडचणीत सापडला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुरकुटे म्हणाले, देशातील साखर उद्योगास या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. आपल्या कारखान्यात आर्थिक अडचणीमुळे काही प्रश्न सोडविण्यासाठी अडचणी येतात. अशाही परिस्थितीत सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कामगार सामंजस्याची भूमिका घेत असल्याने कारखान्याची वाटचाल सुकर होत आहे. यावेळी कामगार नेते अविनाश आपटे यांचे भाषण झाले. सेवानिवृत्त कामगार प्रमोद बिडगर व भिकचंद मुठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी २७ सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारखाना व्यवस्थापन आणि कामगार युनियनच्यावतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. कामगार सभेचे सचिव अविनाश आपटे, कारखान्याचे व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ, संचालक सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, पुंजाहरी शिंदे, आदिनाथ झुराळे, विरेश गलांडे, निरज मुरकुटे, कारेगाव भाग कंपनीचे व्हा. चेअरमन शिवाजीराव मुठे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड आदी मान्यवर उपस्थित होते.