कोल्हापूर : यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिले होते. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हप्ते वेळेवर देता आले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील बरेचसे नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उसामध्ये फुलकळी तयार होण्यास अनुकूल हवामान होते. त्यामुळे या वर्षी बहुतेक ऊस जातींना तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात आला आहे. राज्यात ऊस पट्ट्यात सगळीकडेच तुरा येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. याचा विपरीत परिणाम शेवटच्या टप्प्यातील ऊस तोडणीवरही होणार आहे. यामुळे तोडणीला आलेल्या उसाबरोबर आडसाली लावणीलाही तुरे येत असल्याचे चित्र राज्यातील उस पट्ट्यात आहे.
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाला जर दोन महिन्यांहून अधिक काळ तुरे राहिल्यास ऊस पोकळ होऊन एकरी पाच ते पंधरा टनांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ऊस उत्पादकांत चिंता निर्माण झाली आहे. आडसाली तोडणी उशिरा होत असल्याने तुऱ्याचा सर्वाधिक फटका तोडणीस आलेल्या उसाला बसण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस रोपवाटिकांसाठी देण्याची धडपड सुरू केली आहे. कारखान्यांनासुद्धा तुरे आलेल्या उसाचे गाळप करावे लागणार असल्याने उताऱ्यातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणपणे दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस, रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस व हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के असेल तर ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते. या काळात उसातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. सध्या वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे नव्या उसालाही तुरे येण्यास सुरवात झाल्याने पुढील हंगाम सुरू होईपर्यंत हा ऊस कसा टिकवायचा, अशा विवंचनेत शेतकरी आहेत.

















