कोल्हापूर : दुष्काळजन्य स्थिती, किडीचा प्रादुर्भाव अशा विविध समस्यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके वाळू लागली आहेत. उसाची वाढ खुंटली आहे. त्यातच आता उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाअभावी विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावत आहे. त्यातच उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतात उभा ऊस किडीने कुरतडल्याने ऊस उन्मळून पडू लागला आहे. पाऊस नसल्याने उसाचे वजनही घटले आहे. ऊस गाळपाला जाईपर्यंत वजनात आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कृषी तज्ञांनी हुमणीला आळा घालण्यासाठी मेटारायझियम यांसारख्या जैविक कीडनाशकाचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे.















