परभणी : जिल्ह्यातील ऊसतोड व ऊस वाहतूक ठप्प झाली असून काही साखर कारखाने बंद झाले आहेत, तर उर्वरित कारखानेही येत्या काही दिवसांत ऊसाची आवक नसल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. २८ नोव्हेंबर रोजी शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहनांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ताफ्याद्वारे जिल्ह्यातील ओंकार शुगर्स पांगरी, अंबा साखर अंबाजोगाई, येडेश्वरी शुगर्स केज, गंगा माऊली शुगर्स केज या ठिकाणी भेटी देऊन निवेदने दिली. केंद्र सरकारने उसासाठी १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी प्रति टन ३५५५ रुपये दर जाहीर केला आहे. जिल्ह्यात ११ किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी रिकव्हरी लागत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करता प्रतिटन ३,००० रुपये पहिली उचल तसेच ४,००० रुपये अंतिम दर मिळाला पाहिजे, अशी मागणी या करण्यात येत आहे.
ऊस उत्पादक संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या कोयता बंद, वाहतूक बंद आंदोलनाची व्याप्ती जिल्ह्याबाहेर पोहोचली असून उसाचा ग्रीन बेल्ट असलेल्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी कारखान्यांवर धडक दिली. अनेकांनी समितीला पाठिंबा देत ऊसतोड व ऊस वाहतूक थांबवली आहे. शेतकरी स्वयंस्फूर्तीने समितीत सामील होत, शेकडो वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना भेट देत आपल्या मागण्यांचे निवेदन देत आहेत. ऊस दरासाठी बैठकीत कारखानदारांनी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. ऊस दराबाबत निर्णय न झाल्याने ऊस आंदोलन चिघळले आहे. जर साखर कारखानदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.


















