कोल्हापूर : राज्यात ज्या शेतकऱ्यांकडे बारमाही पाण्याची सोय आहे, ते शेतकरी विशेष करून मे महिन्यामध्ये ऊस लावतात. पुरेसे पाणी असल्याने उन्हाळा असला तरी पाण्याचे नियोजन करून उसाची लागवड होते. यंदा मात्र उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांहून अधिक झाल्याने ऊस उत्पादकांनी ऊस लागवडीचा बेत पुढे ढकलला आहे. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात होणारी ऊस लागवड यंदा मृग नक्षत्रातच होईल अशी चिन्हे आहेत. सध्या ऊस उत्पादक शेतकरी रोपवाटिका चालकांकडे जूनच्या लावणीसाठीच ऊस रोपांची मागणी नोंदवत आहेत. जूनमध्ये रोपांची मागणी येईल अशा बेताने सध्या रोपवाटिकांमध्ये रोपांची निर्मिती सुरू आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अति उन्हामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. पाणी पुरेसे असले तरी उष्णता जास्त असल्याने उसाची वाढ अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे चित्र आहे. पाणी कमी पडल्यास कोवळी रोपे करपण्याचा धोका असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी जूनमध्येच लागवडी करणे पसंत केले आहे. एप्रिल महिन्यात काही प्रमाणात वळीव पाऊस झाला. मेमध्येही चांगला पाऊस होईल व याचा फायदा ऊस लागवडीला होईल या अंदाजाने शेतकऱ्यांनी ऊस रोपांची मागणी केली होती. मे महिन्यामध्ये ऊस पट्ट्यात फारसा वळीव पाऊस झाला नाही. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण मोठे आहे. अनेक शेतकऱ्यांनी आम्ही जूनला लागवड करत असल्याचे कळवले आहे. तशा नियोजनानेच आम्ही रोपे तयार करत आहोत असे कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी येथील रोपवाटिका चालक प्रल्हाद पवार यांनी सांगितले.