जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात वाहणाऱ्या पूर्णा नदीमुळे मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. चालू हंगामात धाड येथील पैनगंगा साखर कारखान्याने या भागातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला. मात्र, शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या चेअरमनना घेराव घातला. कारखान्याने डिसेंबरपासून ऊसतोड झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वी अल्प रक्कम देण्यात आली. तर, जानेवारीनंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस नेला त्यांना उसाचे पैसे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
कारखान्याची बैठक होणार असल्याची माहिती मिळाल्याने बुधवारी, दि. २१ रोजी शेकडो ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यावर एकत्रित आले. त्यांनी शेतकऱ्यांनी अध्यक्षाला घेराव घालून पैशांची मागणी केली. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी मुकुंद देशमुख यांनी सांगितले की, मी पैनगंगा कारखान्याला ऊस दिला होता. दरम्यान, वेळेत उसाचे पेमेंट न केल्याने आपण रीतसर त्यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यांनी १६ ते ३१ मेपर्यंत उसाचे पैसे खात्यात वर्ग करण्यासंदर्भात सांगितले. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत. दरम्यान, ३१ तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील, असे अध्यक्षांनी सांगितले.