नवी दिल्ली : भारताने आपल्या निर्धारित मुदतीच्या पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले की, १० टक्के इथेनॉल मिश्रणामुळे २७ लाख टन कार्बन उत्सर्जनात घट झाली आहे. याशिवाय ४१,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनात बचत झाली आहे. यातून देशातील शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षात ४०,००० कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे पर्यावरणाचे बहुआयामी पद्धतीने संरक्षण झाले आहे. भारताने देशात विजेच्या स्थापित उत्पादन क्षमतेच्या ४० टक्के भार गैर जीवाश्म इंधनापासून मिळविण्याचे उद्दीष्ट निर्धारित वेळेपूर्वी नऊ वर्षे आधीच गाठले आहे. सौर ऊर्जा क्षमता १८ पट वाढल्याचा दावा त्यांनी केला. हायड्रोजन मिशन आणि स्क्रॅपेज धोरण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आमची पर्यावरण संरक्षणाबाबतची वचनबद्धता दिसते असे ते म्हणाले. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी भारताने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांबाबत त्यांनी यावेळी उदाहरणे दिली.

















