जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

जालना : शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या मशागतीसाठी ऊस बिलाच्या दुसऱ्या हप्त्याची आशा लागली आहे. घनसावंगी तालुक्यातील सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम संपून दोन माहिने झाले आहेत. मात्र, आजपर्यंत एकाही कारखान्याने उसाचा दुसरा हप्ता मिळाला नाही. वाढलेल्या महागाईने शेतकरी कोलमडून गेला आहे. साखर कारखानदार याची कितपत दखल घेणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर्षी पावसाचे आगमन लवकर होणार, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. शेतातील मशागतीसाठी शेतकऱ्यांनी जोर धरला आहे. डिझेलच्या दरवाढीचा फटका थेट मशागतीला बसला आहे. एकतर उसाला दरवाढ मिळालेली नाही; त्यात रासायनिक खते, ट्रॅक्टरची मशागत यांच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

अंबड व घनसावंगी तालुक्यातील ऊस समर्थ, सागर, समृद्धी या साखर कारखान्याबरोबर ब्ल्यू सफायर फूड प्रोसेसिंग युनिट या गूळ पावडर या कारखान्यांना पाठवला जातो. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित उसाच्या बिलावर ठरते. खरिपाची मशागत, बी-बियाणे आदीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी या दिवसांत उसाचे दुसरे बिल मिळाले तर शेतकऱ्यांना आधार मिळतो. त्यातच सर्वांच्या नजरा कोणता कारखाना दुसरा हप्ता किती देणार, याकडे लागल्या आहेत. तालुक्यातील साखर कारखाने ऊसबिलाचा दुसरा हप्ता साधारणपणे २०० ते २५० रुपये देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा उसाचा लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठी मदत होणार आहे. कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे. आजपर्यंत तालुक्यातील एकाही कारखान्याने ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम अदा केली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. शिल्लक ‘एफआरपी’ कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here