बेळगाव : यंदा कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उसाची खरी किंमत कळली आहे. सध्या कारखानदार साखळी करून ऊस दराबाबत फसगत करण्याचा घाट घालत असून तो मोडून काढण्यासाठी कर्नाटकातील शेतकरी एकत्रित येऊन आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर रस्त्यावर रोखून धरत आहेत. शेतकऱ्यांची ही ताकद पाहून कारखानदार दोनच दिवसांत नमतील. उसाला अपेक्षित, योग्य भाव मिळेल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. बेडकिहाळ-शमनेवाडी सर्कल परिसरात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ट्रॅक्टरमधून होत असलेली वाहतूक रोखून उसापोटी यंदा ३७५० दरासाठी केलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन ते बोलत होते. गुर्लापूर येथील ऊस आंदोलनात सहभागी होऊन रविवारी रात्री ९ वाजता राजू शेट्टी येथे आले.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस पाठविण्यासाठी गडबड करू नये. यंदाचे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे ऊस शिल्लक राहणार नाही. कारखानदार बाहेरील ऊस घेऊन येत आहेत. ऊस दरासाठी कारखान्यांची कोंडी करावी. यावेळी बाबासाहेब खोत, पंकज तिप्पान्नावर, भरत अम्मानवर, रमेश मालगावे, अभय पाटील, दीपक खोत, विकास समगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांचे स्वागत राजू खिचडे यांनी केले. बंटी पाटील, रमेश पाटील, तात्यासाहेब बसन्नावर यांनी मनोगत व्यक्त केले.











