नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसाला प्रती टन ३५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षीचे प्रती टन २०० रुपये त्वरित द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतकरी भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर लवकरच एल्गार मोर्चा काढणार आहेत. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील अर्धापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाऊराव चव्हाण साखर कारखाना व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील- हंगरगेकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे. सहकारी तत्वावर चालणारे कारखाने आणि संस्था हे राजकारण्यांसाठी कुरण बनले आहेत. उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये द्यावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोयता बंद केला आहे. त्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकरीही आता आंदोलनात उतरणार आहेत.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्यावर्षीच्या उसाला ४०० रुपये अंतिम दर यंदाचा पहिला हप्ता ३५०० रुपये प्रती टन मिळावा यासाठी प्रखर आंदोलन सुरु केले आहे. स्वाभिमानी पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात बेमुदत चक्काजामचा इशारा दिल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. मात्र, मंत्रालयात बैठक होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही.

















