सांगली : सांगली बाजार समितीमध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५ हजार ८५ रुपये असा विक्रमी दर मिळाला. बाजारात साखरेचे ठोक दर प्रतिक्विंटल ४१५० रुपये असताना या तुलनेत गुळाचे वाढलेले हे दर चर्चेचा विषय ठरले आहेत. शनिवारी झालेल्या सौद्यामध्ये सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या अडत दुकानात सुरेश पुणेकर (रा. रायबाग, जि. बेळगाव) यांच्या गुळाला प्रतिक्विंटल ५०८५ रुपये दराने मंगलमूर्ती ट्रेडर्स कंपनीने खरेदी दर दिला. हा दर या हंगामातील उच्चांकी दर आहे. पाव, अर्धा, एक किलो आणि तीस किलो या प्रमाणात हा चिक्की गूळ विक्रीसाठी सांगलीत आणला होता.
यापूर्वी गेल्या हंगामात चिक्की गुळाला प्रति क्विंटल ४२०० ते ४५०० रुपये असा सर्वोच्च दर मिळाला होता. वाढलेली थंडी आणि जवळ आलेला संक्रांत उत्सव यामुळे बाजारपेठेतील गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे सध्या चांगल्या गुळाची उपलब्धताही कमी असल्यामुळे त्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. बाजारात साधारण गुळाचे दर मात्र, प्रतिकिलो ५० ते ५३ रुपये आहेत. सेंद्रिय, रसायन विरहीत गूळही विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत किरकोळ बाजारात आहेत. सांगली बाजार समितीमध्ये शनिवारी ३०० टन गुळाची आवक कर्नाटकातील बेळगाव व शिराळा तालुक्यातून झाली होती. आज झालेल्या सौद्यामध्ये साधारण गुळास किमान ३८०० ते कमाल ४४०० प्रति क्विंटल रुपये दर असून, चिक्की गुळास ४२०० ते ५०८५ रुपये प्रति क्विंटल सरासरी दर आहेत. गुळाला वाजवी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गुळ विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले.

















