हनुमानगढ: राजस्थानमध्ये आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट उभारला जात आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पाणी आणि हवा दूषित होईल, अशी आंदोलकांतून व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारच्या ‘महापंचायती’नंतर शेतकऱ्यांचा एक मोठा जमाव कारखान्याच्या दिशेने निघाला. आंदोलक अनियंत्रित झाल्यावर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कारखान्याची संरक्षक भिंत तोडून आत प्रवेश केला. संतप्त जमावाने बॅरिकेड्स तोडून थेट प्रकल्पाच्या ठिकाणी प्रवेश केला. यावेळी झालेल्या गोंधळात आंदोलनकर्त्यांनी १६ हून अधिक वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलीस व्हॅन आणि जेसीबी मशीन्सचा समावेश होता.
जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला अश्रुधुराचे गोळे सोडावे लागले आणि सौम्य लाठीमार करावा लागला. या संघर्षात सुमारे १० ते १२ पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले संगरियाचे काँग्रेस आमदार अभिमन्यू पूनियां यांच्यासह अनेक लोक जखमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने टिब्बी शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये इंटरनेट सेवा तात्काळ खंडित केली आहे. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसक घटनेबद्दल राजकारण्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.


















