कर्नाटकात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण: 15 हून अधिक ऊस ट्रॅक्टर जाळले; महामार्ग रोखला

मुधोळ (बागलकोट): गुरुवारी मुधोळ आणि बागलकोट आणि विजयपुरा जिल्ह्यांच्या इतर भागात 3,500 रुपये प्रति टन ऊस दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष चिघळला. मुधोळ तालुक्यातील महालिंगपूर शहराजवळील संगनट्टी क्रॉस येथे आंदोलकांनी तब्बल 15 हून अधिक ट्रॅक्टर पेटवले. या घटनेत हजारो टन ऊस जळून खाक झाला आहे.

राज्य सरकारने काढलेला प्रतिटन 3300 रुपये देण्याचा तोडगा अमान्य करत, मुधोळमध्ये शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन 3,500 ऊस दर देण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. सुरुवातीला निपाणी-महालिंगपूर राज्य महामार्गावर त्यांनी वाहतूक रोखली. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याच्या शेडजवळ उसाने भरलेले ट्रॅक्टर पेटवून दिले. घटनास्थळी सुमारे २०० हून अधिक ट्रॅक्टर उभे होते. ऊस पेटवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

शेतकऱ्यांनी दावा केला केला की, सरकारी सूत्र “अवैज्ञानिक” आहे कारण रिकवरी हे ऊस दर निश्चित करण्यासाठी योग्य मानक नाही. शेतकऱ्यांचे नेते मुत्तप्पा कोमर यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी गुंडांनी हिंसाचार केला. काही शेतकऱ्यांनी जमखंडी तालुक्यातील सिद्धापूरजवळ हुबळी-सोलापूर महामार्ग रोखला, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. हुनूर आणि हुल्याल गावांमध्येही रस्ते अडवण्यात आले.

हत्तरगी दगडफेक प्रकरणातील सहा जणांना अटक

ऊसदर घोषित करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी पुणे-बंगळूर या महामार्गावरील हत्तरगीजवळ झालेल्या आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी हत्तरगी टोल नाक्यावर घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here