सुवा : पंतप्रधान कार्यालयातील सहाय्यक मंत्री साकिउसा तुबुना यांनी बा, लौटोका आणि ररावई कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस शेतीला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी साखर उत्पादन क्षेत्रासमोरील असंख्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली.
मंत्री साकिउसा तुबुना म्हणाल्या की, एकेकाळी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या साखर उद्योगाला उसाचे घटते उत्पादन, शेतकऱ्यांचा नफा कमी होणे आणि उत्पादन खर्च वाढणे यामुळे घरघर लागली आहे. त्यांनी या विभागाची स्थिरता आणि भविष्यातील समृद्धीसाठी साखर उद्योगाच्या अडचणीची मूळ कारणे शोधून काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांवर भर दिला.
मंत्र्यांनी सांगितले की, येथील साखर उत्पादन क्षेत्र एका नव्या वळणावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या या उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाी तातडीने परिवर्तनात्मक उपायांची गरज आहे. ऊस उत्पादन घटल्यामुळे साखरेचे उत्पादन खालावले आहे. त्यामुळे एकूण उद्योगाच्या दृष्टिकोनातून साखर उद्योग अकार्यक्षम आणि अस्थिर बनला आहे. बदलती कृषी पद्धती आणि हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम यांसह अनेक कारणांमुळे ही घसरण झाल्याचे मंत्री तुबुना यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हानांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढती मजूरी, वाढलेला ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च, साखरेचे सततचे कमी दर यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडेना झाले आहे. याबाबत मंत्री साकिउसा यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आव्हाने अतिशय चिंताजनक आहेत. त्यांच्या अडचणींचा परिणाम केवळ त्यांच्या जीवनावरच नव्हे तर आपल्या कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण भागावरही होतो आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसमावेशक, बहुआयामी धोरणाची गरज त्यांनी व्यक्त केली.











