दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादकांना अंतिम देयकाचे वाटप : श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन देशमुख

नांदेड : हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम देयकाचे वाटप सुरू केले आहे. दिवाळीपूर्वीच पूर्ण रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना २८०० रुपये, तर मार्चमध्ये ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांना २९०० रुपये प्रतिटन दराने अंतिम ऊसदर दिला जात आहे.

खासगी मालकी असल्यामुळे नवनवीन सहउत्पादनांच्या निर्मितीमध्येही कारखान्याचे व्यवस्थापन आघाडीवर आहे. ‘ऊस उत्पादक शेतकरी हेच आमचे सर्वस्व’ असे मानत व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळपासाठी स्वीकारणे, योग्य मोबदला देणे हे आपले ध्येय मानले आहे. शेतकऱ्यांचा सण सुखाचा व्हावा यासाठी दिवाळीपूर्वी अंतिम देयकाचा सगळा हिशेब पूर्ण केला जाणार आहे. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे व्यवहार करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असे चेअरमन देशमुख म्हणाले.

शेतकऱ्यांना सुरवातीस २५०० रुपये पहिली उचल देण्यात आली. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या उसाला दर पंधरवड्याला ५० रुपये वाढीव रक्कम मिळाली. त्यामुळे मार्चमध्ये ऊस पुरवणाऱ्यांना २७०० रुपयांची पहिली उचल मिळाली होती. या व्यतिरिक्त पोळा सणासाठी १०० रुपये, तसेच दिवाळी सणासाठी आणखी १०० रुपये प्रतिटन देण्यात येत आहेत.

यंत्रसामग्रीत सुधारणा, गाळप क्षमता वाढली

मराठवाड्यात १२ ते १४ महिन्यांचा ऊस गाळपासाठी येतो, हे लक्षात घेऊन गाळप क्षमता वाढवण्यासाठी यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. सध्या दैनंदिन साडेचार ते पाच हजार टन गाळप करण्याची क्षमता आहे. श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याकडे नोंदणी असलेला कोणताही ऊस शिल्लक न ठेवण्याचा शब्द कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिला असून, तसे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here