कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे राबविलेल्या जमीन क्षारपडमुक्ती संदर्भातील ‘श्री दत्त पॅटर्न’ बाबत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्याकडून माहिती घेतली. गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे फायदे, जमीन क्षारपडमुक्तीसाठीची यशोगाथा, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी झालेले प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती दिली.
राज्य व देशपातळीवर क्षारपडीमुळे झालेले नुकसान, श्री दत्त पॅटर्नच्या माध्यमातून पाणथळ आणि क्षारपड जमिनींमध्ये दहा हजार एकरांमध्ये सच्छिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीचे यशस्वी काम, चार हजार एकरांवर मिळणारे उत्पादन, शेतकऱ्यांनी संस्थात्मक पद्धतीने मिळवलेले यश, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत ११ कोटी ४६ लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न, तसेच आगामी काळातील आर्थिक व पर्यावरणीय फायदे अशा अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या.
कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी झालेल्या कामाचे निष्कर्ष व तांत्रिक माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे मांडली. टोपे यांनी घालवाड येथील प्रकल्पस्थळाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असे समाधान त्यांनी व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी विश्वास (दादा) काळे, कीर्तीवर्धन मरजे, मयूरभाई, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.