ऊस तोडणीसाठी मजूर देण्याच्या आमिषाने साडेसहा लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करताना ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार भास्करराव रामचंद्र मोहिते (रा. बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड) यांनी दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात प्रवीण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि राजकुमार पिंक्या पवार (रा. बोरगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणात दोन मुकादम व एका मजुराचा समावेश आहे. २०१९-२० ते २०२१-२२ या हंगामातील व्यवहारात ही फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, ऊस वाहतूकदार भास्करराव मोहिते यांच्याकडून प्रवीण विक्रम काळे याने २०१९- २० मध्ये ऊस तोडणीसाठी एक लाख ७४ हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली. काम सुरू केले मात्र, अचानक काम सोडून ते ९७ हजारांची परतफेड न करता निघून गेले. तर मुकादम अशोक शिवाजी देवकाते याने २२ ऊस तोडणी कामगार देतो, असे सांगून १२ लाख २० हजार रुपये घेतले. त्यातील ४ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड केलेली नाही. तर दुसरे मुकादम राजकुमार पिंक्या पवार याने २०२१-२२ मध्ये दहा ऊस तोडणी कामगार पुरवण्यासाठी तीन लाख २५ हजार रुपये घेतले. यापैकी एक लाख १५ हजार रुपयांची परतफेड केलेली नाही. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here