पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर मिळावा आणि सहकारी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देण्याचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मानस असून, त्यासाठी साखर कारखान्यांसाठी विविध प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी उभारणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
भवानीनगर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, नुकत्याच राज्याच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. अमित शहा हे केंद्राचे सहकार विभागाचे प्रमुख आहेत. देशातील फक्त सहकारी साखर कारखान्यांसाठी हा प्रस्ताव आहे; खासगी कारखान्यांसाठी नाही.
ते म्हणाले की, ‘छत्रपती’सह माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यासह राज्यातील कारखान्यांना देखील विचारणा केली जाणार आहे. या कामासाठी अमित शहा सहकार विभागाला १० हजार कोटी रुपये देणार आहेत, तसेच ३० हजार कोटी रुपये विविध बँकाकडून कमी व्याजदराने उभारणार आहेत. ही ४० हजार कोटी रुपयांची रक्कम देशातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज, डिस्टिलरी आणि विविध प्रकल्पांसाठी देण्याचा प्रस्ताव आहे.












