पुणे : महाराष्ट्रातील २०२३-२४ चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राज्यातील साखरेचे उत्पादन १०८ लाख टनांवर पोहोचले आहे. तसेच राज्यात साखरेचे उत्पादनही गेल्या हंगामापेक्षा जास्त झाले आहे. उपलब्ध अहवालानुसार, एकूण २०७ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. त्यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश होता. राज्यात आतापर्यंत १,०५४.८५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अद्याप काही जिल्ह्यात ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.
राज्यात ३ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यात १,०८०.०६ लाख क्विंटल (१०८ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात २११ साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि १,०५३.३८ लाख टन उसाचे गाळप करून १,०५१.१७ लाख क्विंटल (१०५.११ लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते.
महाराष्ट्रात मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात आतापर्यंत १६० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. तर गेल्या हंगामात ३ एप्रिलपर्यंत २०० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. तसेच या हंगामात साखरेच्या उताऱ्यातही किंचित वाढ दिसून येत आहे. २०२३-२४ च्या हंगामात ३ एप्रिल २०२४ पर्यंत राज्यातील साखरेचा उतारा १०.२४ टक्के होता, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखर उतारा ९.९८ टक्के होता.












