गौरी शुगर युनिट क्रमांक ४ कारखान्याचे आतापर्यंत ७ लाख ५० हजार मेट्रिक टन गाळप : अध्यक्ष बाबूराव बोत्रे- पाटील

अहिल्यानगर : हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गौरी शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि., युनिट क्रमांक ४ या साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आतापर्यंत तब्बल ७ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कमी कालावधीत सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून श्रीगोंदा व शिरूर, कर्जत तालुक्यात गौरी शुगरचा उल्लेख केला जात आहे. ऊसतोडणी बाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस तोडूनच कारखाना बंद करण्यात येईल, असे ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी स्पष्ट केले.

श्रीगोंदा तालुक्यातील या कारखान्याला ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी भेट देऊन गाळप हंगामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उत्पादन प्रक्रिया, साखरेची गुणवत्ता, इथेनॉल निर्मिती प्रकल्प, बॉयलर विभाग, तसेच प्रयोगशाळेची पाहणी केली. कारखाना आणखी १० ते १५ दिवस सुरू राहिल्यास चालू हंगामात गौरी शुगर साखर कारखान्याचे ८ लाख मेट्रिक टनांपर्यंत ऊस गाळप होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोत्रे-पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच ओंकार ग्रुप यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. ऊस उत्पादकांना वेळेवर बिले देणे, पारदर्शक तोल व्यवस्था आणि दर्जेदार सेवा देणे, हेच आमचे धोरण आहे. भविष्यातही शेतकरी हिताला प्राधान्य देत कारखान्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जाईल. गौरी शुगरने साखर उत्पादनाबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली. उर्वरित गाळप हंगाम सुरळीत पार पडावा, अशी अपेक्षाही बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव म्हणाले, की कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा केल्यामुळे गाळप क्षमतेचा पूर्ण वापर साधता आला. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, वेळेवर ऊस तोडणी, वाहतूकदारांचे कष्ट आणि कामगारांच्या परिश्रमामुळेच हा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here