अहमदनगर : अशोक सहकारी कारखान्याने प्रवरा व संगमनेर साखर कारखान्याला दिलेल्या उसाची थकीत एफआरपी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात औताडे यांनी म्हटले की, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस उपलब्ध असल्याने अशोक कारखाना संचालक मंडळाकडून गेली वीस वर्षापासून अतिरिक्त उसाच्या नोंदी घेऊन अशोकमार्फत संगमनेर- प्रवरा साखर कारखान्यांना ऊस दिला जातो. अशोक कारखान्याकडून कार्यक्षेत्रा बाहेरून अडीचशे किलोमीटर अंतराहून जालना जिल्ह्यातून ऊस आणला जातो.
अशोक कारखान्याचे चेअरमन मुरकुटे यांच्याकडून प्रवरा- संगमनेर कारखान्याला ‘अशोक’च्या कार्यक्षेत्रात घुसू देणार नाही, असे वक्तव्य केले गेले. झोनबंदी उठल्याने कार्यक्षेत्राचा विषयच राहिलेला नाही, म्हणजेच अशोक कारखान्यांच्या अध्यक्षांकडून ऊस उत्पादकांची दिशाभूल होत आहे. जो कारखाना जास्तीचा भाव देईल, त्या कारखान्यांना ऊस घालण्याचा अधिकार ऊस उत्पादकांना आहे. उसाचा थकीत एफआरपी संगमनेर कारखाना जो भाव देईल, त्या दराने तातडीने अदा करावी, अशी मागणी औताडे यांनी केली











