नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी आगामी गळीत हंगामात (२०२५- २६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर साखरेचा पुरवठा वाढेल. परिणामी साखरेच्या किमतीवर दबाव येणे शक्य आहे. साखरेच्या वाढीव उत्पादनामुळे अतिरिक्त साखर तयार होईल. ही साखर गेल्या वर्षीपेक्षा साडेसात टक्क्यांनी जास्त असेल. जादा उत्पादनाचा अंदाज पाहिल्यास साखरेला जगातील सर्वच बाजारपेठांमध्ये दरासाठी संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते असे अनुमान वर्तविण्यात येत आहे. जादा पुरवठा व अतिरिक्त साठ्याच्या अंदाजामुळे जागतिक बाजारात आतापासून दरात चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे किमती स्थिर ठेवण्याचे आव्हान उद्योगापुढे असेल.
अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जगात २०२५-२६ मध्ये १८९० लाख टन साखर तयार होऊ शकते असे अनुमान व्यक्त केले आहे. यामध्ये ब्राझीलचे उत्पादन सर्वाधिक म्हणजे ४४० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तर ‘डाटाग्रो’ या संस्थेने, ब्राझीलमध्ये दक्षिण मध्य भागात साखर उत्पादन ६ टक्क्यांनी वाढून ४२० लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे, तर सिझरनिकोने हा अंदाज ४३० लाख टनांचा दिला आहे. थायलंडचे २०२५-२६ मधील साखर उत्पादन २ टक्क्यांनी वाढून १०० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. चीनमध्ये उत्पादन ५ लाख टनांनी वाढून ११० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सर्व संस्थांच्या अहवालात जगातील प्रमुख साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझील व भारतामध्येच साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, भारतामध्ये २०२५-२६ मध्ये एकूण साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून सुमारे ३५० टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर इस्माने उत्पादनात लक्षणीय वाढीचा अंदाज व्यक्त केला. तर भारतात यंदा, २०२६ मध्ये ४० लाख टनांवर साखर इथेनॉलकडे वळवली जाईल अशी शक्यता आहे.