गोवा : संजीवनी कारखान्याच्या जमिनीवर आयआयटी स्थापनेच्या सरकारी प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध

पणजी : संजीवनी साखर कारखान्याची जमीन आयआयटी किंवा कोणत्याही बिगर-कृषी प्रकल्पाला देण्याच्या सरकारच्या कोणत्याही निर्णयाला सांगे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. या भागातील दुर्गम गावांमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या दीर्घकालीन तक्रारींचे निराकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नेत्रावळी येथील शेतकरी हर्षद शंकर प्रभुदेसाई म्हणाले की, संजीवनी कारखान्याच्या उसगाव येथील जमिनीवर आयआयटी उभारणार असल्याच्या अलिकडच्या माध्यमांमधील वृत्तामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे. जमीन गोव्यातील ऊस उत्पादकांच्या मालकीची आहे. ते कारखान्याचे भागधारक आहेत. सरकार आमच्या संमतीशिवाय या जमिनीवर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कारखाना बंद झाल्यानंतर इथेनॉल प्लांट उभारण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या निर्णयामुळे शेतकरी उपजीविकेपासून वंचित राहिले आहे.

शेतकरी चंदा वेळीप यांनी सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचा आरोप केला. खाण क्षेत्र अचानक बंद झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची तुलना खाणकामावर अवलंबून असलेल्या लोकांशी केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्याशिवाय जमीन हस्तांतरित करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी दिला.

केवोणा- रिवोणाचे ज्येष्ठ शेतकरी बोस्टियाओ सिमोइश आणि कुर्डी वाडेम येथील कुष्ठा वेळीप यांनी संजीवनी साखर कारखाना दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन केला होता याची आठवण करून दिली. सिमोइश म्हणाले की, ही जमीन सरकारची नाही तर आमची आहे. शेती दुर्लक्षित केल्याबद्दल कुष्ठा वेळीप यांनी सरकारवर टीका केली. जमिनीचा पुनर्वापर करण्याच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करण्याचे निर्धार केला. आमच्या संमतीशिवाय आयआयटीला जमीन वाटप केल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होईल, असा इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here