नवी दिल्ली : भारतीय उद्योगांनी मोठी स्वप्ने पाहावीत. आणि २०४७ पर्यंत परिवर्तन घडवून आणले पाहिजेत या दृष्टीने काम केले पाहिजे असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या (फिक्की) ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
मंत्री गोयल यांनी दुबई एक्स्पोमध्ये कोविड महामारीमुळे आव्हाने असतानाही केलेल्या प्रयत्नांबद्दल फिक्कीचे कौतुक केले. दुबईसारखेच प्रयत्न दिल्लीत प्रगती मैदानावरील एक्स्पो मध्ये केले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सेवा क्षेत्रातील निर्यातीत वाढ दिसून आली आहे असे सांगून ते म्हणाले, ४०० अब्ज डॉलर व्यावसायिक निर्यात ही खूप चांगली बाब आहे. सरकार आणि उद्योग जगताने एकत्र काम केले पाहिजे हा धडा संकटकाळात मिळाला आहे. आम्ही जर सर्व मोहीम पूर्ण केल्या तर संधी आणखी वाढतील. जर आपण २०३० पर्यंत १० अब्ज डॉलरच्या सेवा आणि व्यापार निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले तर ते निश्चितच पूर्ण होईल असे गोयल यांनी स्पष्ट केले.












