नवी दिल्ली : जगप्रसिद्ध गुगल कंपनीने भारतातील शेती क्षेत्रासाठी ‘अँग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन’ हे ‘एपीआय’ सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याचा वापर भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी करण्यात येईल, असे गुगलने जाहीर केले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ‘एआय’ मॉडेलचा वापर करण्यात येणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या वापराबाबत हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
भारतीय शेती क्षेत्रासाठी ओपन सोर्स एआय आधारित एपीआय (ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल. गुगलच्या एपीआयमुळे पीक कोणतं आहे, शेताचं क्षेत्रफळ किती आहे, कधी पेरणी झाली आहे, कधी काढणी होणार आहे याची माहिती उपग्रह आणि मशिन लर्निंगच्या मदतीनं विविध ठिकाणांवरून मिळवता येणार आहे. शेती क्षेत्रातील कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक माहितीचे विश्लेषण मिळणार आहे.
भारतातील शेतकऱ्यांना फायदा करून देणे एवढ्यापुरता या तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित नाही. तर हवामान बदलाच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठीच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी हे उपयुक्त ठरेल असे गुगल डीपमाइंडचे अँग्रिकल्चर अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च लोड अलोक तळेकर यांनी सांगितले. खासगी कंपन्यांना गुगल एपीआयच्या मदतीने अचूक माहिती मिळेल. या एपीआयचा वापर करून एआय आधारित विविध शेती उपयोगी मोबाइल ॲप्स तयार करता येणार आहेत.
ॲप्सच्या मदतीने शेतकऱ्यांना माती, पाणी, हवामान आणि पीक उत्पादनाचा अंदाज मिळेल. त्यामध्ये अचूकता येण्यासाठी उपग्रह प्रतिमा (सॅटेलाइट इमेजरी) आणि मशिन लर्निंगची मदत घेतली जाणार आहे. पिकांच्या लागवडीचे व काढणीची अचूक आकडेवारी उपलब्ध होईल. याबाबत गुगल डीपमाइंडचे भारत आणि आशिया-पॅसिफिक विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. मनीष गुप्ता म्हणाले की, ‘भारतातील नवीन तंत्रज्ञान क्षमतांच्या वापरासाठी उत्तम तोडगा विकसित केला आहे. या प्रकल्पामुळे शेती क्षेत्रातील एआय गुंतवणुकीवर अनेक पटीने परतावा मिळेल.’