कोल्हापूर : गुणवत्तापूर्ण साखरेमुळे छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या साखरेला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कारखान्याचे स्वतःचे स्टार मानांकन असणारे एक्सपोर्ट हाऊस आहे. यामुळे जागतिक पातळीवर ‘शाहू साखर बॅण्ड’ निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
कारखान्याच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे होत्या. समरजित घाटगे यांनी सर्वच साखर कारखान्यांना सध्या आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिकिलो ४२ रुपये करावी, उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला इतर धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलप्रमाणे दर मिळावा, हंगाम काळात २० लाख मे. टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशा मागण्या केल्या.
समरजित घाटगे म्हणाले, येत्या गळीत हंगामासाठी अकरा लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस पाठवून सहकार्य करावे. कारखाना ऊस विकास कार्यक्रमावर भर देणार असून कागल व मुरगुड येथे दोन आधुनिक ऊस रोपवाटिका सुरू करीत आहे. श्रीमती घाटगे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कारखान्यास विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी, तर ठरावांचे वाचन सेक्रटरी व्ही. एल. जत्राटे यांनी केले. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.