केंद्र सरकारने २६ एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारच्या अन्न मंत्रालयाने देशातील ५५८ कारखान्यांना मे २०२३ साठी साखर विक्रीसाठी २४ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. मे २०२२ च्या तुलनेत १.५० लाख टन कोटा मंजूर करण्यात आला आहे. तर गेल्या महिन्याच्या तुलनेत २ लाख टन कोटा जादा मंजूर केला आहे.
बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मे २०२३ साठी जाहीर केलेला कोटा अपेक्षेपेक्षा खूप जादा आहे. गेल्या वर्षी २२.५ लाख टन कोट्यासह किमती स्थिर होत्या. मात्र, सरकारने किमतीमधील वाढ रोखण्याच्या आपल्या प्रयत्नांचे संकेत देताना कोट्यामध्ये अतिरिक्त १.५० लाख टनाची वाढ केली आहे. या वाढीव पुरवठ्यामुळे आगामी काही दिवसात किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, एप्रिल २०२३ चा मंजूर केलेला कोटाही अद्याप बाजारात आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्यापाऱ्यांना कमी घडामोडी दिसू शकतात. त्याचा परिणाम एक्स मील किमतीवर होऊ शकतो.
केंद्र सरकारने साखर पुरवठा नियंत्रित ठेवणे आणि दर निश्चितीमध्ये स्थिरतेसाठी मासिक कोटा वितरण प्रणाली लागू केली आहे.

















