वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांमध्ये कपात आणि उत्पादनांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे लोकांची खरेदीची इच्छा वाढली असल्याचे दिसते. या बदलामुळे सणासुदीच्या पहिल्या टप्प्यात उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळीपूर्वी खरेदीचे वातावरणदेखील मजबूत झाले आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर कमी केले, ज्यामुळे उत्पादनांच्या किमती कमी झाल्या. कंपन्यांनी या कपातीचा फायदा थेट ग्राहकांना दिला, ज्यामुळे खरेदी वाढली. देशातील आघाडीच्या उत्पादक, किरकोळ विक्रेत्यांनी नवरात्रीच्या काळात सर्वाधिक विक्री केली आहे.
नवरात्रीदरम्यान मारुती सुझुकीसारख्या प्रमुख कार उत्पादक कंपनीला ७ लाखांहून अधिक ग्राहकांकडून चौकशी आणि दीड लाखांहून अधिक कार बुकिंग मिळाल्या असे टीव्ही९ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे. त्यासह विविध कंपन्यांनी नवरात्रीदरम्यान कार विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे नोंदवले. वाहन उद्योगातील महिंद्रा आणि ह्युंदाईसारख्या कंपन्यांनीही या सणासुदीच्या काळात विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. ह्युंदाईच्या एसयूव्ही मॉडेल्स, विशेषतः क्रेटा आणि व्हेन्यू यांना बाजारात मागणी वाढली. इलेक्ट्रॉनिक्स विक्रीतही लक्षणीय वाढ दिसून आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या नवरात्रीत एलजी, हायर आणि गोदरेज यांसारख्या प्रमुख ब्रँड्समध्ये २० ते ८५ टक्क्यांपर्यंत विक्रीची वाढ दिसून आली. हायर इंडियाकडे २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोठ्या स्क्रीन टीव्ही, इतर घरगुती उपकरणांची लक्षणीय विक्री दिसून आली. जीएसटी दरांमधील कपात आणि कंपन्यांनी ग्राहकांना दिलेल्या अतिरिक्त ऑफर्समुळे हा बदल झाला आहे. यावर्षी लहान कार, एसयूव्ही आणि बहुउद्देशीय वाहनांच्या बुकिंगमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे असे मारुती सुझुकीच्या मार्केटिंग प्रमुखांनी सांगितले.
Home Marathi Hot News in Marathi जीएसटी दर कपातीमुळे देशभरातील बाजारात तेजी, नवरात्रौत्सवात विक्रीचा नवा उच्चांक