कोल्हापूर : सद्यःस्थितीत गूळ हा मुख्यत्वे पारंपरिक पद्धतीने बनविला जातो. पारंपरिक पद्धतीने गूळ निर्मिती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात प्रामुख्याने स्वच्छतेचा अभाव, अस्वच्छ साठवणूक व्यवस्था आणि प्रक्रियेत अचूकतेचा अभाव आदी बाबींचा समावेश होतो. त्यामुळे गुळाची गुणवत्ता खालावते, गुळाचा रंग, पोत, चव व कडकपणा यामध्ये अनिष्ट बदल दिसून येतात. गुऱ्हाळघरात गूळ बनविताना स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन करायला हवे.
या माध्यमातून उच्च दर्जाचा आणि सुरक्षित गूळ तयार करता येतो. उत्पादित गुळाची गुणवत्ता आणि आरोग्यदायी गुणधर्मामुळे चव आणि टिकाऊपणा वाढविता येतो, असा सल्ला कोल्हापूर येथील ऊस आणि गुळ संशोधन केंद्रातील अखिल भारतीय समन्वित काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संशोधन प्रकल्पाचे कनिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. गोविंद येनगे यांनी दैनिक ‘अॅग्रोवन’शी बोलताना दिला आहे.
संशोधन अधिकारी डॉ. येनगे यांच्यासह डॉ. दीपक सावळे, कौस्तुभ नकाते, डॉ. विद्यासागर गेडाम या कृषी तज्ज्ञांनी गुळ उत्पादनाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गूळ उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर रसाच्या निर्मितीपासून ते गूळ साठवणुकीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व स्वच्छता राखणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास गुळाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा राखणे शक्य होते. त्यासाठी पारंपरिक पद्धतींच्या मर्यादा ओलांडून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक ठरतो. गूळ बनवण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर, गाळणीत अडकलेल्या वस्तू बाजूला करणे, गुऱ्हाळ घरातील यंत्रसामग्रीची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची स्वच्छता, गूळ प्रक्रियेसाठी आणल्यावर तो धुणे, निवडक वाणांचा वापर गरजेचा आहे. रस काढताना मशिन स्वच्छ ठेवावे. नियमितपणे धुवावे. रस साठवण्यासाठीची टाकी ही स्टेनलेस स्टील (एसएस ग्रेड) पासून बनलेली असावी. त्यातून रस कढईपर्यंत जाण्यासाठी योग्य व्यवस्था असावी. रस नायलॉनच्या गाळणीतून गाळावा किंवा संशोधन केंद्राने विकसित केलेल्या द्विस्तरीय गाळण यंत्राचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच रसाचे तापमान पाहण्यासाठी थर्मोमीटरचा वापर करावा, हानिकारक रसायनांचा वापर टाळावा.
रस परिपक्व झाला की नाही हे तपासण्यासाठी ब्रिक्स मीटर किंवा थर्मामीटर सारख्या उपकरणांचा वापर करावा. गूळ भरण्यासाठी अखिल भारतीय समन्वित काढणी पश्चात अभियांत्रिकी व प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्राने टणी वजा साचा यंत्र विकसित केले आहे. त्याचा वापर करावा. गुळ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य स्टेनलेस स्टीलपासून बनविलेले असावे. ते भारतीय मानक संस्थेने (ISI मार्क) प्रमाणित केलेले असावे. गूळ निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, उपकरणांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी सुचविले आहे.


















