धाराशिव : सध्या केज, अंबाजोगाई, धाराशिव, कळंब, लातूर तालुक्यातील गावांमध्ये ऊस पिकामध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पीक उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्यासाठी नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, शेती कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग आवाड, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथील शास्त्रज्ञांच्या दोन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ‘व्हीएसआय’चे ऊस पैदासकार डॉ. संतोष तळेकर, ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. गणेश कोडगिरे, ऊस कीटक शास्त्रज्ञ डॉ. तुषार शितोळे, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी तट बोरगाव, भोसा, जायफळ, नायगाव, रांजनी, शिराढोण, दाभा, आवाड शिरपुरा आदी गावातील ऊस प्लॉटला भेटी देऊन शेतकऱ्यांना सिओ ६२१७५ या शिफारस नसलेल्या ऊस जातीची लागवड केल्यामुळे चाबूक काणी, गवताळ वाढ या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी रोगांना बळी पडणाऱ्या सिओ ६२१७५ या ऊस जातीची लागवड टाळण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी रोगग्रस्त अवशेष शेतामधून काढून नष्ट करणे, चाबूक काणी रोग व्यवस्थापनासाठी ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के एससी या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर फवारणी करणे, कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र (पाडेगाव), व्हीएसआय यांनी शिफारस केलेल्याच ऊस जातीची लागवड करण्याचे आवाहन केले.
तज्ञांनी ऊस पिकामध्ये सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेला उंदीर, मावा, कांडी किडीचा प्रादुर्भाव निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुचवल्या. नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड यांनी आडसाली ऊस लागवड २०२५-२६ करिता करावयाचे नियोजन बाबत मार्गदर्शन केले. या शिवार फेरी उपक्रमामध्ये कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक ज्ञानेश्वर गायकवाड, वैभव भिसे, स्वप्निल खोसे, कृषी सहाय्यक सचिन देशमुख, जयराज भुजबळ, मेघनाथ माळी, विलास राठोड तसेच शेतकरी विठ्ठल शितोळे, अशोक माचवे, संजय पुदाले, सत्यवान पुदाले, राजाभाऊ खोत, विष्णुपंत टेळे, भैरवनाथ टेळे, रणजित भिसे, दिलीप शिंदे, बालासाहेब आवाड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.