ट्वेंटीवन शुगर्समार्फत शेतकऱ्यांना पूर्व हंगामी ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन

परभणी : समाधानकारक पावसामुळे माजलगाव, जायकवाडी धरण तसेच गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. विहीर, बोअरवेललाही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकरी पूर्व हंगामी ऊस लागवडीचे नियोजन करत आहेत. ऊस पिकाची लागवड करण्यासाठी योग्य जातीची निवड व ऊस पिकाचे करावयाचे एकात्मिक व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या अनुषंगाने ट्वेंटीवन शुगर्स युनिट २ तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ट्वेंटीवन शुगर्स युनिट २ चे अध्यक्ष माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष पाटील, मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ भरत रासकर यांच्या माध्यमातून दोन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत नरवाडी येथे कार्यशाळा घेऊन येळकर यांनी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकामध्ये सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेले चाबुक काणी, गवताळ वाढ, पोक्का बोईंग रोग तसेच कांडी कीड, कृषी संशोधन केंद्रांची शिफारस नसलेल्या एसएनके १३३७४, सिओ ६२१७५ यांची माहिती देऊन मागील वर्षी ऊस लागवड करताना शेतकऱ्यांच्या झालेल्या चुका बाबत ऊहापोह केला. डॉ. भरत रासकर यांनी साखर उतारा कमी असण्याची कारणे, ऊस जातीची भेसळ टाळणे, ऊस लागवडीचा योग्य कालावधी, फुले ऊस १५००६, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७, एम एस १०००१, सिओ ८६०३२, सिओव्हिएसआय १८१२१ ऊस जातींची गुणवैशिष्ट्ये व प्रति हेक्टरी उत्पादकता आणि साखर उतारा, त्रिस्तरीय बेणे मळा पद्धती, रोप पद्धतीने ऊस लागवड केल्यामुळे खर्चामध्ये होणारी बचत, ऊस पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खताच्या ग्रेड निहाय संतुलित मात्रा, ऊस लागवड करण्यासाठी जमिनीची निवड, जमिनीची मशागत, सरी तयार करताना घ्यावयाची काळजी सेंद्रिय खतांचा वापर संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली.

त्यांनी शासनामार्फत बंदी आणलेल्या सिओ ६२१७५ व शिफारस नसलेल्या एसएनके १३३७४ ऊस पिकाची लागवड केल्यामुळे होणारे तोटे लक्षात घेता अशा ऊस जातीची लागवड टाळण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले. मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांनी कारखान्या मार्फत अनुदानित ऊस रोप वितरण, एकात्मिक ऊस व्यवस्थापन सल्ला केंद्र या ऊस विकास योजनांची माहिती दिली. यावेळी ऊस पुरवठा अधिकारी रतन कदम, विभाग प्रमुख लक्ष्मीकांत रेवडकर, राम कुलकर्णी, विठ्ठल लाटे, दिनेश जयस्वाल, भगवान सोळंके, वैजनाथ हांडे, सर्व गटप्रमुख, ऊस नर्सरी चालक विजय नांदूरे, प्रगतिशील शेतकरी भगवानराव जोगदंड, नंदकुमार जोगदंड, जगन्नाथ जोगदंड, भागवत पांडुळे, सिद्धेश्वर पांडुळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here