चंदीगड : हरियाणातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगामाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. साखर कारखान्यांद्वारे जादा महसूल मिळविण्यासाठी विविध उपाय अवलंबले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सहकारी साखर कारखान्यांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने बगॅसपासून गिट्टी तयार करणारा प्लांट उभारण्याची तयारी सुरू आहे. यासाठी, साखर कारखाना महासंघ लवकरच कृती आराखडा तयार करेल. त्याचवेळी, कारखान्यांमधील साखर पिशव्यांवर ऑनलाइन मार्किंग केले जाईल. प्रत्येक साखर पिशवीवर अनुक्रमांक, बॅच क्रमांक, साखर उत्पादन आणि साखर भरण्याची तारीखदेखील नोंदवली जाईल. दरम्यान, पानीपत येथील सहकारी साखर कारखान्यात १५० कोटी रुपये खर्चून इथेनॉल प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असे सांगण्यात आले.
साखर महासंघ आणि संबंधित सहकारी साखर कारखान्यांची आढावा बैठक सहकार मंत्री डॉ. अरविंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. कर्नाल, गोहाना, सोनीपत, जिंद, पलवल, मेहम आणि कैथल येथील सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपानंतर शिल्लक राहिलेल्या बगॅसपासून गिट्टी तयार करण्यासाठी पीपीपी पद्धतीने प्लांट उभारले जातील असे सहकारी साखर कारखान्यांच्यावतीने सांगण्यात आले. २०२५-२०२६ च्या गाळप हंगामासाठी, या कारखान्यांमध्ये ३४३ लाख क्विंटल ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्यांमध्ये गाळप हंगामासाठी ६० टक्के देखभालीचे काम पूर्ण झाले आहे. सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयेंद्र कुमार, साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक शक्ती सिंह, सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक यावेळी उपस्थित होते. कारखान्यांमधील तोटा कमी करण्यासाठी वीजनिर्मिती वाढविण्यासोबतच इतर पर्यायांवरही काम करण्याचे सुचवण्यात आले आहे. ऊस उत्पादकांना मजुरांच्या संदर्भात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कापणी यंत्र अनुदान देण्यात यावे, असे आदेशही मंत्र्यांनी दिले आहेत.