कोल्हापूर : राज्यात ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्यापासून ऑक्टोबर अखेरपर्यंत पडलेल्या सततच्या पावसामुळे उसाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबर महिना हा उसाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, याच काळात सूर्यप्रकाशाचा अभाव आणि सततचा पाऊस यामुळे उसाला पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी, उसाची कांड्यांची लांबी आणि जाडी कमी राहिली. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार, यंदा उसाच्या वजनात एकरी ५ ते ७ टनांची घट दिसून येत आहे.
सुरुवातीला आडसाली उसाची तोडणी झाली, मात्र आता सुरू असलेल्या लागण आणि खोडव्याच्या उत्पादनात ही तूट प्रकर्षाने जाणवत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात या हंगामात साधारणपणे २ कोटी ४५ लाख टन गाळप होण्याचा अंदाज आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५ लाख टनांनी कमी आहे. कोल्हापूर विभागाची ही पिछेहाट साखर उद्योगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना महापुराचा मोठा फटका बसत होता. महापुरामुळे साधारण ६५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान व्हायचे. यंदा सुदैवाने महापूर आला नाही, त्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान टळले. मात्र, ‘महापुराने तारले असले तरी सततच्या पावसाने मारले’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
















