हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ऊसतोड कामगार समिती तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांचा सविस्तर व अद्ययावत सर्वेक्षणाद्वारे डाटा संकलित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. ऊसतोड कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत साखर कारखान्यांमार्फत ऊसतोड कामगारांची माहिती व नोंदणी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजना, महिला ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्या, गर्भवती महिला ऊसतोड कामगारांसाठी उपलब्ध सुविधा तसेच माता व बालकांच्या आरोग्य विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऊस तोड कामगारांची ओळख पटविण्यासाठी सुस्पष्ट व सविस्तर सर्वेक्षण प्रश्नावली तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्वेक्षणातून संकलित झालेल्या अद्ययावत डाटाच्या आधारे ऊसतोड कामगारांना ई- श्रम कार्ड देण्यात यावे. शासनाच्या विविध सामाजिक व कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र कामगारांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
















