हिंगोली : टोकाई कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिले जमा – चेअरमन भावनाताई मुंगसे

हिंगोली : चेअरमन भावनाताई मुंगसे यांच्या नेतृत्वात तुळजाभवानी शुगर प्रा. लि. सहयोगी तत्त्वावर चालविण्यात येत असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याने सर्व सभासदांच्या ऊस बिलाची रक्कम खात्यावर जमा केली आहे. आता पुढील गाळप हंगामात पूर्वीपेक्षा विक्रमी गाळप साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत भावना मुंगसे यांनी व्यक्त केले. शेतकरी हा कणा असतो. शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन करूनच पुढील यशस्वी वाटचाल करावी लागते. ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या विश्वासाने कारखान्यावर ऊस आणतो व आपले भविष्य ठरवतो. पण काही संचालक त्यांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा अशा कोणत्याही अफवेवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असे मत भावनाताई मुंगसे यांनी व्यक्त केले.

चेअरमन मुंगासे म्हणाल्या की, शेतकरी, सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखाना हे एक आपले घर असून उत्पादक सभासद, संचालक, कर्मचारी तसेच ऊस वाहतूकदार हे सर्व कारखान्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. सहकारी तत्त्वावर कोणताही व्यवसाय चालवत असताना एकमेकांना साथ देणे व एकमेकांना विश्वासात घेऊन पुढे वाटचाल करणे ही तत्त्वे पाळणे फार मोलाची असतात. दुर्दैवाने काही संचालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले. याबद्दल तीव्र नाराजी भावना मुंगसे यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here