हिंगोली : यंदा वसमत विभागातील कपीश्वर शुगर्स ॲण्ड केमिकल्स आणि पूर्णा सहकारी साखर कारखान्याने आपल्या ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबवली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या कारखान्यांनी घेतलेल्या विशेष दक्षतेमुळे विभागातील ऊस वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात घट झाली आहे. कारखान्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीला ‘कापडी रिफ्लेक्टर’ लावले आहेत. साखर कारखान्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि शिस्तबद्ध नियोजनाबद्दल वसमत परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची मोठी भीती असते. मात्र, वसमत विभागातील कारखान्यांनी हंगामाच्या सुरुवातीलाच दक्षता घेतली. कपीश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अतिष दांडेगावकर यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांची विशेष बैठक बोलावली. अपघात होऊ नये, या उद्देशाने त्यांनी प्रत्येक वाहनाला कापडी रिफ्लेक्टर लावण्याचे आवाहन केले. कापडी रिफ्लेक्टरचे वाहनधारकांना मोफत वाटप करण्यात आले. पूर्णा साखर कारखान्यानेही कार्यक्षेत्रातील वाहनांना रिफ्लेक्टर बसवून दिले. या उपाययोजनेमुळे वाहतूक सुरक्षित झाली. या कापडी रिफ्लेक्टरमुळे लांबूनच ऊस वाहतुकीच्या वाहनांचा अंदाज इतर वाहनधारकांना येतो. परिणामी संभाव्य अपघातात घट झाली आहे. कारखाना प्रशासनाने दाखवलेली ही सतर्कता आणि वाहनचालकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

















