हिंगोली : वाशिम महामार्गावरील बासंबा फाट्याजवळ १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास ऊसतोड कामगारांना घेऊन गावाकडे निघालेली पीकअप गाडी उलटली. या अपघातात १४ जण जखमी झाले असून, ते पुसद व वाशिम तालुक्यातील रहिवासी आहेत. पीकअप उलटून ऊसतोड कामगार जखमी झाल्याची माहिती १०८ कंट्रोल रूमला कळताच दोन रुग्णवाहिका डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह अवघ्या १० मिनिटांत अपघातस्थळी हजर झाले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार, पुसद तालुक्यातील ऊसतोड कामगार कर्नाटकमधून गावी परतत होते. त्यांचे पीकअप हिंगोली ते वाशिम मार्गाने जात असताना बासंबा फाट्याजवळ उलटले. अपघातात पीकअपमधील विरेन राठोड, कविता राठोड, राजेश राठोड, ज्ञानेश्वर राठोड, सत्यजित राठोड, वंदनाबाई राठोड, युवराज राठोड, सविता राठोड (सर्व रा. लाखी, ता. पुसद), गोपाल चव्हाण, फुलप्पा चव्हाण (दोघे रा. ईलका, ता. जि. वाशिम) यांच्यासह १४ जण जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा व्यवस्थापक प्रमोद हिवराळे, डॉ. सचिन भोसले, डॉ. साई देशमुख, रुग्णवाहिका चालक चंद्रकांत पोले, नागेश सुवर्णकार, रोहित कल्याणकर यांनी तत्परता दाखविली.


















