हिंगोली : हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीला वेग, उत्पादन घटत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

हिंगोली : चालू हंगामासाठी ऊस लागवड क्षेत्र उपलब्ध असले, तरी हंगाम उशिरा सुरू झाल्याने वेळेत गाळप करणे साखर कारखान्यांसमोरही आव्हान ठरत आहे. सातत्याने झालेल्या पावसामुळे व शेतात साचलेल्या पाण्यामुळे ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच मजूर टंचाईचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे ऊसतोड करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, ऊस तोडणीदरम्यान, तसेच या उसाची वाहतूक करताना होणाऱ्या नुकसानीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यंत्राने तोडलेला ऊस तुकड्या-तुकड्यांत विभागला जातो. तोडणी यंत्राच्या वेगामुळे लहान व कोवळ्या कांड्या दूरवर फेकल्या जातात. त्या गोळा करण्याचा प्रयत्न केला, तरी अनेकदा हाताला लागत नाहीत. परिणामी, एकरी अपेक्षित उताऱ्याच्या तुलनेत शेतकऱ्यांची तूट होत आहे. आधीच पावसाअभावी किंवा अतिवृष्टीमुळे उसाची वाढ समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे एकरी उतारा घटला आहे. अशा परिस्थितीत यंत्राद्वारे ऊस तोडीमुळे अतिरिक्त तूट येत असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

सद्यस्थितीत साखर कारखान्यांना हार्वेस्टर यंत्राद्वारे तोडलेला ऊस वाहून नेणारी वाहने रस्त्यांवरून जात असताना ठिकठिकाणी उसाच्या कांड्यांचा सडा पडत आहे. वाहनचालक क्षमतेहून अधिक कांड्या भरत असल्याने त्या रस्त्यावर पडून इतर वाहनांच्या टायरखाली येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊस पक्व होण्यासाठी शेतकरी किमान महिना ते दीड महिनाआधी पाणी बंद ठेवतात. त्यामुळेच एकरी उसाच्या वजनात किमान १० टक्के घट होते. यंत्राद्वारे तोडलेल्या उसामध्ये पाला-पाचोळा व घाण मिसळल्याने साखर कारखान्याकडून पाच टक्के तूट धरली जाते. केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी यांत्रिकी प्रशिक्षण व परीक्षण संस्थेने मजुरांकडून केल्या जाणाऱ्या ऊस तोडणीच्या तुलनेत यंत्राद्वारे केलेल्या तोडणीत एकरी सुमारे २० टक्के उसाची हानी होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. तरीही ऊस झटपट तोडला जात असल्याने शेतकरीही मजुरांऐवजी यंत्राकडे वळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here