सोलापूर : राज्य सरकारने ऊस उत्पादनाच्या अनुषंगाने उच्च साखर उतारा, मध्यम साखर उतारा व कमी साखर उतारा असे तीन भाग केले आहेत. कोल्हापूर व लगतच्या जिल्ह्यात उच्च, सोलापूर व लगतच्या जिल्ह्यात मध्यम, तर विदर्भात कमी साखर उतारा मिळतो. त्याच पटीत ऊस दरही देणे अपेक्षित आहे. सोलापूर जिल्हा हा मध्यम साखर उताऱ्याच्या पट्ट्यात येतो.
साखर उताऱ्याचा विचार करता कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या ऊसदरात फरक राहणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या ऊस दराची तुलना करणे अयोग्य असल्याचे मत साखर कारखानदारांनी व्यक्त केले आहे. मंगळवेढ्याची ज्वारी व सांगोल्याच्या डाळिंबाची चव व उत्पन्न मिळते तसे कोल्हापूर जिल्ह्यात येते का? असा सवाल कारखानदारांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठी शेतकरी संघटना तसेच अनेक ठिकाणी थेट शेतकरीच आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी साडेतीन हजार रुपये ऊस दराची मागणी केली आहे. सततच्या आंदोलनांनी किमान तीन हजार रुपये पहिली उचल जाहीर करण्यास कारखानदारांना भाग पाडले जात आहे. जिल्ह्यात पाच साखर कारखाने चालविण्यासाठी घेतलेल्या ओंकार शुगरने चांगला दर जाहीर केला आहे. त्यामुळे नवख्या ओंकार ग्रुपला तीन हजारांचा दर परवडतो तर तुम्हाला का नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील ऊस उत्पादक कारखानदारांना विचारत आहेत.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या या जिल्ह्यात ऊस दरासाठी संघर्ष तीव्र झाला आहे. त्यामुळे कारखानदार आपली बाजू मांडत आहेत. राज्य सरकारने भौगोलिक परिस्थितीचा विचार करूनच उच्च साखर उतारा, मध्यम साखर उतारा व कमी साखर उतारा, असे राज्याचे भाग केले आहेत. जसा कोल्हापूरच्या उसाचा साखर उतारा १३-१४ टक्के असतो, तसा सोलापूर जिल्ह्यातील उसाला उतारा मिळत नाही. श्री पांडुरंग कारखान्याचे प्रमुख प्रशांत परिचारक, लोकनेते बाबूराव पाटील शुगरचे राजन पाटील यांनी २०१९ मध्ये साखर विक्रीची कमीत कमी किंमत ठरविण्यात आली. त्यानंतर ऊस तोडणी वाहतूक खर्च वाढला. कामगार पगार वाढला. मात्र, साखर विक्रीचा दर वाढलेला नाही असे त्यांनी सांगितले.

















