कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी विक्रमी सुमारे शंभर लाख टन साखर करणाऱ्या देशाला यंदा परवानगी दिलेली दहा लाख टन साखरही निर्यात करणे मुश्कील होऊन बसले आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढील हंगाम सुरू होईपर्यंत कशीतरी आठ लाख टन साखर निर्यात होऊ शकेल असा अंदाज आहे. जागतिक बाजारात सध्या सुरू असलेल्या किमतीच्या अस्थिरतेचा फटका साखर निर्यातीला बसत आहे. असोसिएशनकडील माहितीनुसार, ६ जून २०२५ पर्यंत भारताने ५.१६ लाख टन साखर निर्यात केली आहे. यापैकी ६ जून २०२५ पर्यंत सोमालियाला सर्वाधिक १ लाख १८,५५३ टन निर्यात झाली. या खालोखाल श्रीलंकेला ७६ हजार ४०१ टन, अफगाणिस्तानला ७२ हजार ८३३ टन निर्यात झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे साखर खरेदीसाठी जवळ आलेल्या देशांनी ब्राझील व अन्य देशांचा पर्याय शोधला आहे.
केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. मात्र सुरुवातीचे एक-दोन महिने वगळता साखर कारखान्यांनीच निर्यातीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. जागतिक बाजारातही जादा साखर उत्पादनाच्या शक्यतेने साखर दराची तेजी फारशी नाही. देशांतर्गत दरापेक्षा जागतिक बाजारात जादा दर मिळतील, अशी शक्यता नसल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. २० जानेवारी २०२५ ला निर्यात परवानगी मिळाल्यापासून, भारताने ५. ३८ लाख टन पेक्षा जास्त साखरेची निर्यात केली आहे. यात वाहतुकीखालील साखरेचा समावेश केल्यास हा आकडा साडेपाच लाख टनांपेक्षा थोडासा अधिक आहे. सध्या देशातून सोमालिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तान, बांगला देश या देशांना प्रामुख्याने साखरेची निर्यात झाली आहे. ३० एप्रिल २०२५ पर्यंत ४. २४ लाख टन साखर निर्यात झाली होती. सध्याची स्थिती पहाता यंदाचा हंगाम सुरू होईपर्यंत निर्यातीची गती कमी राहील, असा अंदाज आहे. सध्या जुलैचा कोटा कमी केल्याने देशांतर्गत बाजारात साखरेचे दर क्विंटलमागे चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढले आहेत. दर अत्यंत कमी आले तरच कारखानदार निर्यातीचा विचार करू शकतात.