जालना : अंबड व घनसांगवी तालुक्यात साखर कारखानदारीच्या उभारणीतून अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटला. त्यासाठी कारखान्यांच्या गाळप क्षमता वाढविण्याबरोबर दराचीही स्पर्धा लागली. आता विधानसभा निवडणुकीची राजकीय मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. सर्वच कारखाने राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे आहेत. माजी मंत्री राजेश टोपे, भाजपचे सतीश घाटगे आणि शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण या तिघांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी आहे. त्यामुळे त्यांचे कारखाने आगामी काळात राजकीय केंद्रबिंदू म्हणून पुढे येत आहेत. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव मिळावा, एकमेकांत स्पर्धा होऊन या भागातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागावा, असा सूर ग्रामीण भागात आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यात उसाची जवळपास २७ हजार हेक्टर लागवड करण्यात येते. राजेश टोपे यांचे अंबड तालुक्यात अंकुशनगर येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना व घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी येथे युनिट क्रमांक दोन सागर सहकारी साखर कारखाने आहे. शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांचा ब्लू सफायर फूड प्रोसिंसिंग युनिटचा गूळ पावडर कारखाना उढाण कंडारी येथे दीड हजार मेट्रिक टन क्षमतेचा आहे. तर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नव्याने कुंभार पिंपळगाव येथे तीन हजार मेट्रिक टन कारखान्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. भाजपचे सतीश घाटगे यांचा रेणुकानगर देवीदहेगाव येथील समृद्धी साखर उद्योगाच्यावतीने पूर्वीच्या ५००० मे. टन गाळप क्षमतेचे दुप्पट विस्तारीकरण करून कारखाना सुरू होणार आहे. तिघाही नेत्यांकडून २८५० रुपये ते २९५० रुपये प्रती टन दर देण्यात आला आहे.

















