पुणे : साखर आयुक्तालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 5 फेब्रुवारी 2026 अखेर 888.8 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आणि 825.59 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.29 टक्के आहे. राज्यात 98 सहकारी आणि 102 खाजगी अशा एकूण 200 कारखान्यांचा हंगाम सुरु आहे. मागील हंगामात याच कालावधीत 98 सहकारी आणि 101 खाजगी अशा एकूण 199 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होता. मागील वर्षी याच काळात 673.66 लाख टन ऊस गाळप होऊन 614.58 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. सरासरी साखर उतारा 9.12 टक्के इतका होता.
पुणे विभागात आतापर्यंत 199.52 लाख टन उसाचे गाळप
कोल्हापूर विभागाने 190 लाख टन उसाचे गाळप करून 206.21 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 10.85 टक्के इतका आहे. विभागात 25 सहकारी आणि 12 खासगी असे 37 कारखाने सुरु आहेत. पुणे विभागात 17 सहकारी आणि 13 खाजगी असे एकूण 30 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत 199.52 लाख टन उसाचे गाळप करून 191.67 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 9.61 टक्के आहे.
अहिल्यानगर विभागात 97.88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
सोलापूर विभाग ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 17 सहकारी आणि 31 खाजगी असे एकूण 47 कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 192.86 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 162.43 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 8.42 टक्के इतका आहे. अहिल्यानगर विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात 15 सहकारी आणि 11 खाजगी असे एकूण 26 कारखाने सुरु झाले आहेत. कारखान्यांनी आतापर्यंत 110.63 लाख टन गाळप करून 97.88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहिल्यानगर विभागाचा साखर उतारा 8.85 टक्के आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 87.39 लाख टन उसाचे गाळप
छत्रपती संभाजीनगर विभागात 13 सहकारी आणि 9 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यांनी 87.39 लाख टन उसाचे गाळप करून 69.06 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 7.9 टक्के इतका आहे. नांदेड विभागात 10 सहकारी आणि 20 खाजगी असे एकूण 30 कारखाने सुरु असून त्यांनी 97.22 लाख टन उसाचे गाळप करून 88.89 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.14 टक्के इतका आहे.
नागपूर विभागात 0.67 लाख क्विंटल साखर उत्पादन
अमरावती विभागात 1 सहकारी 3 खाजगी कारखाने सुरु असून 9.68 लाख टन उसाचे गाळप करून 8.78 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.07 टक्के आहे. नागपूर विभागात 3 खाजगी कारखाना सुरु झाला असून 1.5 लाख टन गाळप झाले असून 0.67 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 4.47 टक्के इतका आहे.

















