सातारा : जिल्ह्यातील गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस गाळप सुरू असून खासगी व सहकारी मिळून १७ साखर कारखान्यांनी आजअखेर ७८.२२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे तर ७२.८४ लाख क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.३१ असून सहकारी कारखान्यांचा उतारा ११.०२ आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्यानाला ११.९४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. रेठरे कृष्णा कारखाना आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी (श्रीराम) कारखाना यांचा साखर उतारा ११.५९ टक्के आहे. साखर उत्पादनात कृष्णा आणि सह्याद्री साखर कारखाने पुढे असून, दि. १२ अखेर कृष्णा कारखान्याने १० लाख ७८ हजार ९० तर सह्याद्री कारखान्याने ५ लाख ४६ हजार ९९० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ७२.८४ लाख साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. ऊस गाळपामध्ये खासगी साखर कारखाने पुढे आहेत. मात्र साखर उताऱ्यात हे कारखाने मागे पडले आहेत. खासगी कारखाऱ्यांनी आतापर्यंत ४४ लाख ६५ हजार ३३० मेट्रिक टन उसाचे गाळप करताना ३५ लाख ८६ लाख ५०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ३३ लाख ५७ क्विंटल २०५ मेट्रिक टन ऊस गाळप करून ३६ लाख ९६ हजार ९९० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यांना ११.०२ टक्के साखर उतारा मिळाला आहे. दैनिक ‘लोकमत’शी बोलताना कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले कि, जिल्ह्यात गाळप हंगाम गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्य व कामगारांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. गाळपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उताराही अधिक राहणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

















