धाराशिव : रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रिज लिमिटेड या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्यासाठी पहिल्या हवामान केंद्राची उभारणी पूर्ण करून त्याचा प्रारंभ मंगळवारी (ता. नऊ) जिल्हा कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक, अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) मोठ्या प्रमाणात वापर करणारा रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. येत्या पाच वर्षांत कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण क्षेत्रावर एआय तंत्रज्ञानाचा वापरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ठोंबरे यांनी सांगितले की, एकूण २६ हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. एका केंद्राच्या अडीच किलोमीटर चारही बाजूंच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ३५ गावांमध्ये एआय वापराची सुरवात केलेली आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही शेतकऱ्यांनी ११८ ते १५० टन प्रतिएकरी ऊस उत्पादन घेतले आहे. यामध्ये २५ टक्के खर्चात बचत होणार असून, ३५ टक्के उत्पादनात वाढ मिळणार आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सरडे यांनी मार्गदर्शन केले. ॲग्रिकल्चर ट्रस्ट (बारामती), वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या ( पुणे ) वतीने ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्यासाठी ७०० शेतकऱ्यांची निवड केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी सूत्रसंचालन केले. ऊस विकास व्यवस्थापक अशोक गुजर यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















