अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांमुळे भारतात गहू व तांदूळ उत्पादनात वाढ

नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत भारतातील गहू आणि तांदळाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. शेतीमध्ये नवीन उत्पादन व संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब, तसेच अधिक उत्पादन देणाऱ्या आणि हवामान बदलाला तोंड देऊ शकणाऱ्या बियाण्यांच्या सुधारित जातींचा विकास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी दिली.

शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात त्यांनी सांगितले की, 2024-25 या वर्षात भारतातील गव्हाचे उत्पादन 117.95 दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षातील 113.29 दशलक्ष टनांपेक्षा 4.65 दशलक्ष टनांनी अधिक आहे. 2020-21 मध्ये गव्हाचे उत्पादन 109.59 दशलक्ष टन होते. 2024-25 मध्ये देशातील तांदळाचे एकूण उत्पादन 150.18 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षातील 137.83 दशलक्ष टनांपेक्षा 12.36 दशलक्ष टनांनी जास्त आहे. 2020-21 मध्ये देशातील तांदळाचे उत्पादन 124.37 दशलक्ष टन होते.

‘बिझनेसलाइन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, 16 फेब्रुवारीपर्यंत केंद्राच्या साठ्यात गहू आणि तांदळाचा एकूण साठा अनुक्रमे 24.83 दशलक्ष टन आणि 35.26 दशलक्ष टन होता, तर निर्धारित साठा निकष गव्हासाठी 13.8 दशलक्ष टन आणि तांदळासाठी 7.61 दशलक्ष टन आहेत. चौधरी यांनी सांगितले की उत्पादन वाढण्याचे कारण शेतीखालील क्षेत्र वाढणे आणि उत्पादकतेत सुधारणा होणे हे आहे. याशिवाय जैविक व अजैविक ताणांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात हवामानास अनुकूल उच्च उत्पादन देणाऱ्या जातींचा विकास तसेच कमी खर्चातील आणि प्रभावी प्री-हार्वेस्ट व पोस्ट-हार्वेस्ट तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here