कोल्हापूर : चांगल्या बियाण्यांचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केल्यास ऊस उत्पादनात वाढ होऊ शकते. जमिनीचे क्षेत्र वाढत नसल्याने आहे त्या क्षेत्रातून जादा उत्पादन घेणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी नवीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. तालुक्यात अतिवृष्टीने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या चालू पीक कर्जाचे समान ९ हप्त्यांमध्ये परतफेडीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मान्यता द्यावी व शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, असे दोन ठराव आयत्यावेळच्या विषयांत मांडून सभासदांनी त्यास मंजुरी दिली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, २०२३-२४ हंगामात शासनाने उसाच्या रसापासन थेट इथेनॉल निर्मितीस बंदी घातली. या निर्णयामुळे कोट्यवधीचा फटका कारखानदारीस बसला. केंद्र शासन साखरेचा हमीभाव वाढवत नसल्याने कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कारखान्याच्या माध्यमातन गेल्या २५ वर्षांत ऊस व कारखान्यामुळे तालुक्यात आर्थिक सुबत्ता आली आहे. ऊस विकासाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांनी उपलब्ध क्षेत्रामध्ये कमी खर्चात जादा उत्पन्न घ्यावे. आगामी हंगामातील कारखान्याच्या ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकरी वर्गाने पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितास पाठवून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले.सभेस व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, सभासद, तोडणी वाहतूक कंत्राटदार, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. आभार सचिव नंदू पाटील यांनी मानले