साखरेची किमान विक्री किंमत व इथेनॉल दरात वाढ करा : केंद्रीय कृषीमूल्य आयोगाच्या बैठकीत केली मागणी

पुणे : साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति क्विंटलला ३१०० रुपये कायम असून, ती ४१०० रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच इथेनॉलच्या दरात वाढ करून प्रति लिटरला दर सरसकट ७० रुपये करण्यात यावेत. महाराष्ट्राला इथेनॉल पुरवठ्याचा कोटा वाढवावा, अशी मागणी राज्याच्यावतीने केंद्रीय कृषीमूल्य आयोग तथा कृषी खर्च आणि किंमतींसाठी आयोगाच्या (कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट ॲण्ड प्राईस सीओसीपी) बैठकीत करण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे गुरुवारी (दि.३०) सकाळी पुढील वर्षीचा साखर हंगाम २०२६- २७ या संदर्भात उसाच्या किंमत धोरणासाठी महत्त्वपूर्ण बैठक सीओसीपीचे अध्यक्ष प्रा. विजयपॉल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, साखर संचालक डॉ. केदारी जाधव उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश या १० राज्यांचे साखर आयुक्त व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्राचा इथेनॉल कोटाही वाढवा…

महाराष्ट्राची इथेनॉल उत्पादनात खासगी ५० साखर कारखाने, ४६ सहकारी साखर कारखाने आणि स्टॅण्ड अलोन डिस्टलरी ४० मिळून एकूण १३६ इथेनॉल प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचे मिळून राज्यातील वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ३१५ कोटी लिटरइतकी आहे. असे असताना ऑईल कंपन्यांनी महाराष्ट्राला चालूवर्षी केवळ १०२ कोटी लिटरइतकाच इथेनॉल पुरवठा मंजूर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी कोटा वाढवावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी बैठकीत केलेली आहे. ज्यामुळे इथेनॉल उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर होईल आणि साखर कारखाने अधिक सक्षमपणे चालण्यास मदत होईल, असेही बैठकीत स्पष्ट केल्याचे डॉ. कोलते यांनी सांगितले.

बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे व मागण्या….

देशपातळीवर यंदा साखर निर्यातीचा कोटा २५ ते ३० लाख मे. टन करण्यात यावा. ज्यामुळे साखर दर स्थिरावण्यास मदत होईल.

ऊतीसंवर्धित ऊस रोपांना अधिक वाव देण्यात यावा. त्यासाठी बीजोत्पादन तयार करण्यासाठी कारखान्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

सहवीज निर्मिती योजनांना मुदतवाढ देण्यात यावी.

साखरेची किमान विक्री किंमत प्रतिक्विंटलला ३१०० रुपये असून ती ४१०० रुपये करण्यात यावी.

सी हेवी, बी हेवी, सिरपपासूनच्या इथेनॉलच्या सध्याच्या दरात सरसकट वाढ करून प्रतिलिटरला दर ७० रुपयांपर्यंत करण्यात यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here