नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील वाटाघाटी महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. या करारामुळे काही कृषी उत्पादनांच्या आयातीचा भारतीय शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिका सोयाबीन, मक्का आणि सोया तेल ही तीन प्रमुख कृषी उत्पादने भारतात पाठवण्याशी संबंधित व्यापारी अडथळे दूर करण्याची मागणी करत आहे. मका आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जर भारताने अमेरिकेची मागणी मान्य केली तर मका आणि सोयाबिन हे सर्वाधिक प्रभावित होणारे पिक असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात २०२४-२५ मध्ये देशात सुमारे १.२ कोटी हेक्टर जमिनीवर मका आणि सुमारे १.३ कोटी हेक्टर जमिनीवर सोयाबीनचे पीक घेण्यात आले. तर भारताच्या एकूण मक्याच्या उत्पादनापैकी बिहारचा वाटा सुमारे ९-११ टक्के असण्याची अपेक्षा आहे. बिहारचे मक्याचे उत्पादन सुमारे ५० लाख टन होते तर देशाचे उत्पादन सुमारे ४२.२ दशलक्ष टन होते. यातून राज्यात धान्य-आधारित इथेनॉल क्षेत्रातही क्रांती घडली आहे. सध्या राज्यात १७ धान्य-आधारित इथेनॉल युनिट्स कार्यरत आहेत ज्यांची क्षमता दररोज ६५ किलोलिटर ते २५० किलोलिटर आणि त्याहून अधिक आहे.
इथेनॉल उत्पादकांकडून वाढत्या मागणीमुळे बिहारमध्ये मक्याची बाजारपेठेतील किंमत २०२२ मध्ये १६००-१७०० रुपये प्रति क्विंटलवरून २०२४ मध्ये २५००-२६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढली. या वर्षी एप्रिलपासून ती २२००-२२५० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावली आहे. इस्माचे माजी महासंचालक अविनाश वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादक ग्रामीण परिवर्तन घडवून आणत आहे. तर मक्याच्या अनियंत्रित आयातीचा राज्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. सोयाबीन आयातीचा फटका मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रालादेखील बसू शकतो. सोयाबीनचे दर सध्या एमएसपीपेक्षा कमी म्हणजे सुमारे ३८००-४२०० रुपये क्विंटल आहेत.